गरज कृतीयुक्त शिक्षणाची-
शीतल बापट
शिक्षणविषयक
बदलती ध्येयधोरणं कायमच चच्रेत असतात. आगामी काळात कोणत्या क्षेत्रात कोणत्या
प्रकारच्या मनुष्यबळाची किती आवश्यकता आहे, याचा कोणताही अभ्यास न
करता शिक्षणविषयक धोरणं जाहीर केली जातात आणि लाखोंच्या संख्येने पदवीधरांचा ओघ दर
वर्षी सुरू राहतो. एका शैक्षणिक वर्षाचं अखेरचं पर्व सुरू होत असताना शिक्षण
प्रक्रियेतल्या या त्रुटींची चर्चा करायलाच हवी.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही एक विशेष गुण असतो. तसा तो प्रत्येक विद्यार्थ्यांतही
असतो. असे गुण ओळखून त्यांना वाव देणं, प्रगतीसाठी प्रोत्साहन
देणं गरजेचं ठरतं. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला ख-या अर्थाने
हातभार लागत असतो. खरं तर या संदर्भात पूर्वीच्या शिक्षण पद्धतीपासून वेळोवेळी
प्रयत्न करण्यात आले. परंतु शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं, औद्योगिक
विकासाचं वारं वेगानं वाहू लागलं, त्यावेळी शिक्षणक्षेत्रात
काही महत्त्वाचे बदल झाले. कारण या काळातल्या गरजा वेगळ्या होत्या. या प्रक्रियेत
रोजगाराच्या दृष्टीने कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला जात होता. त्याचा प्रभाव
एवढा होता की, तीच प्रक्रिया शिक्षण पद्धतीतून पुढे सुरू
राहिली. यात आऊटकमवर फोकस दिला जात आहे, मात्र इनपुटकडे लक्ष
दिलं जात नाही. अर्थात, ग्लोबलायझेशनच्या या सुरुवातीच्या
कालखंडातल्या शिक्षण पद्धतीचे काही चांगले परिणाम समोर आले, त्याचबरोबर
काही दुष्परिणामही पाहायला मिळाले.
याचा सर्वात
महत्त्वाचा अनुकूल परिणाम म्हणजे सार्वत्रिकीकरणामुळे शिक्षण तळागाळातल्या
लोकांपर्यंत पोहोचलं; परंतु त्यातून निर्माण होणारी क्रिएटीव्हीटी
साचेबद्ध राहिली. आणखी एक बाब म्हणजे या प्रक्रियेत अधिक प्रमाणात निपजलेली सेल्फ
ओरिएंटेड मुलं इतरांशी स्पर्धा करू लागली; परंतु त्यांची
स्वत:शी स्पर्धा नाही, असं दिसून आलं. शिवाय पालकांची
मानसिकताही अशीच असायची. म्हणजे आपल्या मुलानं इतरांशी स्पर्धा करावी, असं पालकांना आवर्जून वाटायचं. त्यामुळे आपल्या मुलांनी वारंवार
स्पर्धामध्ये भाग घ्यावा, असा पालकांचा आग्रह असतो. त्यातून
प्रसंगी त्यांच्यावर दबाव आणला जातो. दहावी, बारावीनंतर
पुढील शिक्षणासाठी शाखेची निवड करण्याबाबतही असंच चित्र ब-याच प्रमाणात पाहायला
मिळतं. आपल्या मुलाचा उपजत ओढा कोणत्या विषयाकडे आहे, त्याला
कोणता विषय अधिक आवडतो, पुढे जाऊन तो स्वत: कोण होऊ इच्छित
आहे, याचा विचार बहुतांश पालक करत नाहीत. त्यावेळी पालक
आपल्याला वाटतो तो निर्णय मुलांवर लादतात. मग पुढे अशा मुलांची प्रगती नीट झाली
नाही, तर त्याचं खापरही मुलांवरच फोडलं जातं. त्यातही
एखाद्या शाखेतल्या शिक्षणाला अधिक वाव आहे, असं लक्षात आलं
किंवा तशी माहिती कुणी तरी दिली की त्यावर विश्वास ठेवत मुलांना त्याच शाखेच्या
शिक्षणासाठी पाठवलं जातं. यामुळे ठरावीक शाखांमध्ये विद्यार्थ्यांची मोठय़ा
प्रमाणावर गर्दी, तर अन्य शाखांमध्ये विद्यार्थ्यांची वानवा
असं परस्परविरोधी चित्र उभं राहतं. यामुळे आज बेरोजगारी वाढलेली दिसत असली तरी
काही क्षेत्रात कुशल कामगारांना मागणी असूनही ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत
नसल्याचं पाहायला मिळतं.
या पार्श्वभूमीवर
आता काळ बराच बदलला आहे. किंबहुना, विविध क्षेत्रात वेगानं
घडामोडी घडत आहेत. प्रगत तंत्रज्ञानातही वेगानं होणारे बदल विस्मयचकीत करायला
लावणारे आहेत. मात्र, हे बदल लक्षात घेऊन येत्या काळात
निर्माण होणा-या संधींचा विचार करून शिक्षण पद्धतीत काही बदल केले जात आहेत का,
हा खरा प्रश्न आहे. आजकाल संशोधन क्षेत्रात झपाटय़ाने बदल होत आहेत.
तंत्रज्ञानाचा जणू स्फोट होतोय. मात्र, या सा-या परिस्थितीत
शिक्षण पद्धत तशीच राहणं उचित आहे का, या प्रश्नाचं उत्तर
नाही असंच द्यावं लागेल. वास्तविक, आता शिक्षण घेणारी मुलं
२०३० मध्ये पदवीधर होणार आहेत. त्यावेळी विविध क्षेत्रात काय बदल झालेले असतील,
कोणतं प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात येईल आणि त्या दृष्टीने कोणत्या
नव्या संधी उपलब्ध होतील, त्यासाठीचे निकष काय असतील,
त्या वेळच्या गरजा काय असतील, याचा विचार करून
आजची शिक्षण प्रक्रिया राबवली जाण्याची आवश्यकता आहे. खरं तर हे सारे मुद्दे
लक्षात घेऊन शिक्षणाची रचना ठरवणं अवघड किंबहुना, आव्हानात्मक
आहे. त्या दृष्टीने आपण आजच्या शिक्षणाकडे पूर्वीच्याच मानसिकतेतून पाहणार का,
हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे चेंज मॅनेजमेंट अर्थात बदलाला सामोरं
जाण्याची तयारी आणि त्यासाठीचं व्यवस्थापन या बाबींना विशेष महत्त्व प्राप्त होणं
गरजेचं आहे.
पूर्वी
विद्यार्थ्यांसाठी पुस्तक आणि शिक्षक हेच ज्ञानाचे, माहितीचे मुख्य
स्त्रोत असत. उर्वरित बाबी कुटुंबातून शिकायला मिळत असत. परंतु आता प्रगत
माहिती-तंत्रज्ञानाच्या जमान्यात माहितीचं अवकाश अधिक व्यापक झालं आहे. या
स्त्रोताच्या आधारे कुठलीही माहिती क्षणार्धात प्राप्त करणं शक्य होत आहे; परंतु या सा-या परिस्थितीत विद्यार्थ्यांची जीवनकौशल्यं विकसित होण्याच्या
संधी कमी मिळतात, हे लक्षात घ्यायला हवं. सध्याच्या शिक्षण
पद्धतीत विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर विशेष भर दिला जात आहे. त्याच प्रमाणे
शिक्षक आणि पालकांकडून सततच्या अभ्यासासाठी दबाव टाकणं, त्यांना
या क्षेत्रातल्या स्पध्रेविषयी सातत्यानं उपदेश करणं अशा स्वरूपाचे प्रयत्न होताना
पहायला मिळतात. मात्र, यात मुलांना समजून घेणं, त्यांच्या क्षमता काय आहेत, मर्यादा काय आहेत या
बाबी समजून घेतल्या जाणं अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याची सुरुवात घराघरांतून
व्हायला हवी. त्या दृष्टीने शिक्षकांनीही आपल्या भूमिकेत बदल करायला हवा.
विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि कृतीयुक्त शिक्षण द्यायला हवं. मुख्यत्वे
परीक्षा पद्धत बदलण्याची गरज आहे. आजकाल विद्यार्थ्यांना स्वत:ला ओळखून करिअर
गायडन्सच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची विशेष गरज आहे. कारण कोणताही विद्यार्थी
कौशल्यं आत्मसात करून वा उपजत कौशल्यात आणखी भर टाकत कारकिर्दीच्या दृष्टीने
स्वत:ला सिद्ध करू शकतो. किंबहुना, स्वत:चं स्थान निर्माण
करू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना वाव दिला जाण्याची गरज आहे. थोडक्यात सांगायचं,
तर वास्तवात परीक्षांच्या निकालाची टक्केवारी वाढवण्यापेक्षा त्या
शिक्षणातून विद्यार्थ्यांना किती ज्ञान मिळालं, याचा विचार
होणं आवश्यक आहे.
खरं तर
आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा सरकारचा निर्णय चांगला होता; परंतु
या निर्णयाची नीट अंमलबजावणी झाली नाही. शिवाय वेगवेगळे अर्थ काढून या निर्णयावर
टीकाच करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अन्य देशांमधील शैक्षणिक तसंच परीक्षा आणि
मूल्यमापन पद्धती जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. आपल्याकडे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत
स्पर्धात्मकता अधिक असून त्या मानाने संधींची वानवा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर
पुढील प्रवेश सुलभ होणं हाच गुण मिळवण्याचा महत्त्वाचा निकष मानला जात आहे. त्या
दृष्टीने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही नववी, दहावीतच
विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाचे वेध लागलेले असतात. वस्तुत: दहावीतल्या गुणांचं
महत्त्व तेवढय़ापुरतंच असतं. आपल्याकडे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश
सुकर होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. परंतु ठरावीक
महाविद्यालयांमध्येच प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचं पहायला मिळतं.
डोक्यात बसलेल्या प्रवेशासाठीच्या अशा काही ठाम कल्पनांना छेद देण्याची गरज आहे.
शिक्षण ही निरंतर
चालणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये काळाच्या ओघात बदल होत जाणं हे सुदृढ
शिक्षणप्रणालीचं शिक्षण आहे. हे लक्षात घेऊन प्रचलित शिक्षण पद्धतीत कालसुसंगत बदल
करत राहणं गरजेचं आहे. तसे बदल होत असले तरी त्यांची गती वाढण्याची आवश्यकता आहे.
त्या दृष्टीने सर्व घटकांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत. शिक्षण प्रक्रियेत
एक-एक मूल घडवणं म्हणजे बंदरात जहाज बांधण्यासारखं आहे. कोणतंही बांधलं जाणारं
जहाज बंदरात सर्वात सुरक्षित असतं; परंतु त्याची रचनाच
सागरात जाण्यासाठी करण्यात आलेली असते. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या नौकेला
२१व्या शतकात कुठली दिशा द्यायची, तिला कुठल्या वादळांचा,
आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, याचा
विचार करून त्या संदर्भात तयारी करून घेणं हे आजच्या शिक्षण पद्धतीच्या दृष्टीने
अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
(लेखिका
‘श्यामची आई’ फाऊंडेशनच्या संस्थापक
संचालिका आहेत.)
No comments:
Post a Comment